संगणकीय स्वातंत्र्य (प्रश्न विचारा स्पर्धा)

शेजारधर्म आणि मैत्री

आई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं.

आपण पिढ्यान् पिढ्या वेगवेगळे पदार्थ खात आलो. अगदी कोणती वनस्पती, भाजी म्हणून खाण्यायोग्य आहे- विषारी तर नाहीना, हे ठरवण्यासाठीही काही शतकांपूर्वी कोणीतरी धोका पत्करला होता. काहींनी एखादा पदार्थ अधिक चवदार बनवला, काहींनी मसाल्यांचा शोध लावला. आणि मुख्य म्हणजे ही प्रक्रिया, माहिती त्यांनी आपल्या शेजाऱ्यांपासून दडवली नाही. ती मुक्त केली. म्हणून आपण आज पोषक, चवदार जेवण जेवू शकतो. मानव जातीचा भविष्यकाळ सुखदायी व्हावा म्हणून मुक्त प्रणाली ही भूमिका आज बजावत आहेत.

स्वातंत्र्य-कुठे स्वातंत्र्य-कुणा स्वातंत्र्य ?

कविवर्य वसंत बापटांच्या कवितेतली ही ओळ छान आहे. पण….
संगणकाची एखादी प्रणाली वापरण्याचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय ?
कुणाचं स्वातंत्र्य कोणी काढून घेतलं होतं, कोणी मिळवून दिलं ?
हे स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे का ?

हा लेख आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात स्थान मिळवून बसलेल्या संगणकासंबंधातल्या स्वातंत्र्या बद्दल आहे. त्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल आहे.

संगणकीय स्वातंत्र्याची चार कलमे

  • कोणत्याही कारणासाठी कितीही संगणकांवर ती प्रणाली वापरण्याचे स्वातंत्र्य. (तुम्ही जेव्हा विंडोझ वा तत्सम अमुक्त प्रणाली वापरता त्यावेळी प्रत्येक संगणकासाठी ती वापरण्याचे वेगळे लायसेन्स फी भरून तुम्हाला घ्यावे लागते.)
  • या प्रणालीचा उगम (सोर्स कोड) पाहून अभ्यासण्याचे स्वातंत्र्य. उगमात बदल करून प्रणाली इतर कोणत्याही वेगळ्या कारणासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य. या सगळ्यासाठी मुक्त प्रणाली लिहिणाऱ्यांनी त्याचा उगम सर्वांसाठी खुला केलेला असलाच पाहिजे.
  • या प्रणालीच्या नकला करून त्या इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. या मुळे तुम्ही तुमच्या मित्रांना – शेजाऱ्यांना मदत करू शकता.
  • मूळ प्रणालीत तुम्ही बदल केल्यानंतर या नव्या रूपातल्या प्रणालीच्या नकला इतरत्र वितरित करण्याचे स्वातंत्र्य. त्यामुळे तुम्ही केलेला बदलही इतरांपर्यंत जाऊन पोहोचतो. यासाठी तुम्ही बदल केलेला उगम या नकला बरोबर उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरते.

बंधनात टाकणाऱ्या प्रणाली

तुम्हा आम्हाला बंधनात टाकणाऱ्या प्रणाली वर लिहिलेल्या एकाही स्वातंत्र्याचा लाभ देत नाहीत. याचा अर्थ काय ते आधी पाहूया. कोणतीही संगणकीय प्रणाली लिहिण्यासाठी आधी….

  • तिचा सोर्स कोड (उगम कार्य-क्रम) तयार करावा लागतो.
  • तो लिहिल्यावर कंपाइल केला जातो.
  • तेव्हा त्याचे रूपांतर असे होते की संगणक त्याचा वापर करू शकतो. याला एक्झिक्यूटेबल (संगणकीय वापरायोग्य) फाइल असे म्हणतात.
  • आपण जेव्हा ही फाइल संगणकावर चालवतो तेव्हा आपल्याला अपेक्षित काम संगणकाकडून केले जाते.

तुमच्या असं लक्षात येईल की उगम कार्यक्रम हा या पायऱ्यांमधला सर्वात महत्वाचा भाग आहे. उगम कार्यक्रम माणसेच तयार करतात. नंतर त्याचे रूपांतर संगणकामार्फतच वापरायोग्य फाइलमधे केले जाते. एकदा का वापरायोग्य फाइलमधे हे रूपांतर झाले की ती फाइल माणसांना थेट वाचून समजत नाही. पण उगम कार्यक्रम मात्र वाचून समजून घेता येतो. अमुक्त प्रणालींचे निर्माते केवळ वापरायोग्य अशा फाइल्सच तुमच्या पर्यंत पोचवतात. उगम कार्यक्रम खुला केला जात नाही.

कोणतीही अमुक्त प्रणाली कधीही उगम कार्यक्रम वापरकर्त्याला उपलब्ध करून देत नाही. तुम्ही असे विचाराल की मला कुठे उगम कार्यक्रम वाचून समजतो ? आणि समजला तरी त्याचे मी काय करू ?
तुम्हाला स्वतःला जरी हा उगम समजला नाही तरी तुमच्या कोणा मित्र मैत्रिणीला हा समजू शकेल आणि अपेक्षित कार्याशिवाय एखादे गुप्त कार्य ही प्रणाली तुम्हाला अज्ञानात ठेऊन करते आहे का याचा शोध लागेल. पण असे गुप्त (आणि दुष्ट) काम केले जाते का ?
होय असे केले जाते ! तुम्हाला माहिती असलेला संगणकीय व्हायरस हे त्याचे अनेकांपैकी एक उदाहरण आहे. असा व्हायरस तुमच्या एखाद्या नेहमीच्या वापरतल्या (उदा. वर्ड प्रोसेसर) प्रणालीला चिकटतो आणि स्वतःचा दुष्ट कार्यभाग साधतो. पण जर वर्ड प्रोसेसरचा उगम उपलब्ध झाला तर अशा प्रणालीला व्हायरस चिकटू नये याची आधीच काळजी घेता येते.

इंटरनेट एक्सप्लोअरर या मायक्रोसॉफ्टच्या ब्राउजरला असे अनेक जंतू चिकटतात असे सिद्ध झाले आहे. या जंतूंमुळे तुमच्या संगणकावरील माहिती इंटरनेटद्वारे पळवली जाते. शिवाय हा जंतू बाहेरून चिकटला आहे, का मूळ उगमातच अंतर्भूत आहे हा संशय शिल्लक राहतोच. मायक्रोसॉफ्ट आपला कोणताही उगम कार्यक्रम उघड करत नाही. म्हणून त्यांच्या सर्व प्रणाली अमुक्त (आणि धोकादायक) आहेत असे म्हणता येईल.

मुक्त प्रणाली आपला उगम कार्यक्रम इंटरनेटवर जाहीर करतात. तो सतत अनेक तज्ञांच्या देखरेखीखाली असतो. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.

मुक्त प्रणाली साधारणपणे मुफ्तही असतात. त्याचे कारण असे की या प्रणाली घडवणारे आपापले नोकरी व्यवसाय संभाळून स्वतःचा वेळ इतरांच्या उपयोगी पडावा यासाठी काम करत असतात.

उगम कार्यक्रम खुला असण्याचे फायदे

हा उगम कार्यक्रम आम्हाला समजत नाही त्यामुळे मुक्त प्रणालींचं आम्हाला महत्व का वाटावं, असं अनेकांचं म्हणणं असतं. हा उगम कार्यक्रम कोण समजून घेऊ शकतो ? याचं उत्तर असं आहे – लिहिता वाचता येणारं कोणीही !

मात्र त्यासाठी तो समजून घेण्याची इच्छा, वेळ आणि कष्टाची तयारी या गरजेच्या गोष्टी आहेत. समजा या तीनही गोष्टी तुमच्या कडे नसतील आणि यातलं आपल्याला काय समजणार, अशी भीती मनात असेल तर तुमचा असा मित्र/मैत्रिण गाठा की जी हे करू शकते. ती कदाचित इंजिनियर असेल, कॉंप्यूटर क्षेत्रातली जाणकार व्यक्ती असेल. विज्ञान क्षेत्रातील तज्ञ असेल. माझ्या माहितीत काही डॉक्टरही (रोग्यांना औषध देणारे) असे आहेत की जे यात रस घेऊन काम करतात.

उगम कार्यक्रम खुला करण्याच्या या अटी मुळे केवळ संगणकीय प्रणालीच मुक्त झाल्या आहेत असं नाही, तर त्या वापरल्यामुळे आपणही (खाजगीपणा जाण्याच्या) भीतीतून मुक्त होतो. कारण कोणती प्रणाली आपल्याबद्दल कोणती माहिती जमा करते आहे याचे भान आपल्याला येऊ शकते.

सा विद्या या विमुक्तये

मुक्त उगम कार्यक्रम अनेकांना मुक्त करतात. ही मुक्तता मिळालेल्यात प्रथम येतात संगणकशास्त्राचे विद्यार्थी. गल्लोगल्ली असलेल्या संगणकशास्त्राच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा दर्जा यथातथाच आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचं महत्वाचंं कारण म्हणजे चांगली प्रणाली कशी लिहायची असते हे त्या विद्यार्थ्यांना कधी पहायलाच मिळालेलं नाही. केवळ मुक्त प्रणालीच ही अडचण सोडवू शकते. खुले उगम कार्यक्रम पाहून, वाचून, समजून घेऊन हे विद्यार्थी जाणकार होऊ शकतात, आणि जाणकाराकडेच असते निर्मितीची शक्ती.

मुक्त प्रणाली, मूळ उगम कार्यक्रमात आपल्या गरजे नुसार बदल करण्याचं स्वातंत्र्यही देते. त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या गरजे प्रमाणे नव्याने प्रणाली विकसित करू शकतात.

अनेक पदव्या घेतल्यावरही काहीच निर्माण न करता येणारे आपल्या भारत देशात प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळेच ते बेकारीच्या भीतीच्या छायेत सतत वावरत असतात. या भीतीतून विद्याच त्यांना मुक्त करू शकते केवळ पदवी नव्हे. विद्या प्राप्त करून घेण्याची संधी मुक्त प्रणाली देत असते. “सा विद्या या विमुक्तये” या संस्कृत अवतरणाचा अर्थ तोच आहे.

उगम कार्यक्रम खुला केल्यामुळे आणखी एक फायदा होत असतो. या कार्यक्रमात थोडा फरक केल्यामुळे नव्या सोयी असणारी प्रणाली पटकन निर्माण करता येते. त्यामुळे नव्या प्रणाली मुळापासून लिहाव्या लागत नाहीत आणि वेळ वाचतो. मुक्त प्रणाली वापरल्यानं चाकाचा शोध आपल्याला पुन्हा पुन्हा लावावा लागत नाही. (“We don’t have to re-invent the wheel”).

शब्दे वाटू धन जन लोकां

मुक्त संगणक प्रणालीचं वैशिष्ट्य केवळ उगम कार्यक्रम खुला करणं इतकंच नाही. तर मूळ प्रणालीच्या बदललेल्या अनेक आवृत्ती लोकांना वितरितही करता येतात यात आहे.

संगणकशास्त्राच्या वर्गात कोणी एकानं लिहिलेल्या प्रणालीचा उगम कार्यक्रम, त्यानं सर्वांना वाटलाच पाहिजे असा नियम असायला हवा. त्यामुळे मुक्त प्रणालीचे फायदे विद्यार्थीदशेपासूनच सगळ्यांना कळतील. हे कॉपी करणं नाही का होणार ? हो होईल ! पण ते वाईट असेल असं नाही. ते सहकार्याची भावना वाढवेल आणि कमी वेळात नव्या सोयी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आणि संधी प्रत्येक विद्यार्थ्याला देईल. शिवाय मूळ प्रणाली मधे छोटे छोटे बदल केलेल्या अऩेक प्रणाली निर्माण होतील.

आज आपण संगणकीय युगात वावरत आहोत. उच्चशिक्षित व्यक्ति पासून ते अक्षरओळखही नसलेल्या माणसापर्यंत  प्रत्येक जण संगणक मोठ्या प्रमाणात वापरतो (भ्रमणध्वनी मधे संगणकच असतो). या प्रत्येक संगणकात जर मुक्त प्रणाली वापरली गेली तर माणसाचा खाजगीपणा जपला जाईल आणि बडे भैय्या आपल्यावर सतत नजर ठेवू शकणार नाहीत. बहुचर्चित स्मार्ट-सिटी मधील स्मार्ट यंत्रणांपासून ते मतदान यंत्रांपर्यंत प्रत्येकात लहानसे पण ताकदवान संगणक वापरले जातात हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातली प्रत्येक प्रणाली मुक्त असायला हवी ही मागणी आपण केली पाहिजे.

 ***********************
प्रश्न विचारा स्पर्धा

वरील लेख वाचून तुमच्या मनात जे प्रश्न निर्माण होतील त्यातले महत्वाचे दोन प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. सर्वोत्तम ठरलेल्या तीन प्रश्नांना विज्ञान केंद्रातर्फे पारितोषिके दिली जातील व प्रश्नकर्त्यां शालेय विद्यार्थ्यांची नावे व फोटो विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील. तुमचे प्रश्न तुम्हाला पुढील फॉर्म भरून विचारता येतील. प्रश्न विचारण्याची शेवटची तारीख मंगळवार दि. १० सप्टेंबर २०१९. स्पर्धेचा निकाल रविवार दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी विज्ञानदूत या विज्ञान केंद्राच्या मासिकात व या संकेतस्थळावर जाहीर होईल.
**********************