अन्न हे पूर्णब्रम्ह – आहारातून आरोग्य

आपल्या आरोग्याची गुुरूकिल्ली म्हणजे आपला आहार होय. योग्य आहार घेतल्यामुळे कुपोषणच नव्हे तर आधुनिक युगातील नवीन राक्षस (मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्रदयविकार) दूर पळतील. हल्ली जंक फूड म्हणजेच साखर, मीठ, मैदा जास्त असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ले जातात. पौष्टिक पदार्थांच्या अभावी आजची पिढी नवनवीन आजारांना बळी पडत आहे. हे टाळायचे असेल तर नक्कीच आपण सर्वांनी राईसप्लेट ऐवजी पौष्टिक थाळीचे सेवन करायला हवे.

—————-जेवणाचे ताट——————

मग हे जेवणाचे ताट कसे असायला हवे? तर संतुलित, वैविध्यपूर्ण व नैसर्गिक, आणि सूक्ष्मअन्नद्रव्यांनी परिपूर्ण असे. अरे बापरे!! किती कठिण!! पण आपले जेवण पौष्टिक करायला एकच सोपी युक्ती आहे. आपल्या जेवणात जास्तीत जास्त रंगांचा समावेश करणे. हिरवी पालेभाजी, तांबडा भोपळा, लाल बीट, गाजर, टोमॅटो इ. जेवढ्या प्रमाणात भाजी आणि फळे, तेवढ्याच प्रमाणात तृणधान्ये (भात, भाकरी, पोळी) व कडधान्ये व डाळी असाव्यात. एखादे आंबट फळ रोज खावे. भाज्या व फळे आहार जीवनसत्वयुक्त व खनिजयुक्त बनवितात. रोज वेगळी तृणधान्ये, उदा. नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ जेवणात समाविष्ट करावीत. डाळी व कडधान्ये यामध्ये पण वैविध्य असावे, उदा. तूर, मूग, मसूर, उडीद, हरभरेे, मटकी, चवळी, राजमा, छोले, सोयाबीन यांना मोड आणणे व आंबविणे. ह्या दोन्ही प्रक्रिया आहाराली सकस बनवितात.

दूध व दुधाचे पदार्थ (ताक, दही, पनीर) आहारातील श्वेतरंग (पांढरा) देतात. यांचा समावेश मुबलक प्रमाणात करावा. अंडी, मांस, मासे उच्च दर्जाची प्रथिने देतात, म्हणून आवडत असल्यास जरूर खावे. ह्या सर्वांबरोबर योग्य प्रमाणात पाणी (दिवसातून कमीतकमी २ लिटर) प्यावे.

आपले अन्न जेवढे नैसर्गिक, सेंद्रिय खतावर वाढलेले, ताजे व घरी शिजवलेले तेवढे त्याचे पोषणमूल्य अधिक. म्हणजेच जर वैविध्यपूर्ण, सूक्ष्मअन्नद्रव्य व जीवनसत्व परिपूर्ण व नैसर्गिक आहार ह्या चतुःसूत्रीचे पालन केले तर आयुष्य निरामय होईल.

डॉ. आश्लेषा दांडेकर , तळेगाव