औषधाविना आरोग्य – २

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणमं । आतुरस्य विकारप्रशमनं च ।।’ 
हे आयुर्वेदाचे प्रयोजन किंवा हा आयुर्वेदशास्त्राचा उद्देश आहे.  परंतू यातील पहिली ओळ जास्त महत्वाची.

हे शक्य आहे ?

“स्वस्थस्य” म्हणजे जो स्वस्थ,निरोगी,आनंदी आहे.त्याची ती स्थिती कायम
राहण्याची तजवीज करणे किंवा तसा प्रयत्न करणे.”स्वास्थ्यरक्षणम” ह्या जोडशब्दाचा तोच अर्थ आहे. आता ही निरोगी अवस्था ठेवता येऊ शकते का ?
तर ह्या प्रश्नाचे उत्तर “होय” असे आहे. पण त्यासाठी प्रयत्न अत्यावश्यक असतात.

अहितकर आहारविहार

“अहितकर आहारविहार”, (हा वाक्प्रचार आता वाचकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे हं. कारण हा  वारंवार
वाचावा लागणार आहे.) यातील “अहितकर ” या शब्दाचा अर्थ असा आहे की, जे शरीर आणि मन यासाठी वा या दोन्हींसाठी त्रासदायक ठरणारे आहे.’आहार’ म्हणजे ‘खाण्याचे पदार्थ ‘अथवा ‘खाणे ‘ या अर्थानेही हा शब्द वापरता येतो.
“अहितकर आहार” म्हणजे,जे खाणे शरीराला त्रासदायक आहे ते.
बाल्यावस्थेत ते पालकांच्या लक्षात येते.त्या अनुषंगाने आई-बाबा किंवा इतर जबाबदार व्यक्ती बाळाचे खाणे,पिणे यांवर अती जागरुकतेने लक्ष ठेवत असतातच. जसजशी शारिरीक आणि बौद्धिक वाढ होऊ लागते तसतसं ज्याला त्याला,आपल्या शरीराला योग्य काय ? ते समजू लागतं.
जसं हे खाण्यापिण्याच्या बाबतीत होतं,तसंच ते विहाराच्या बाबतीत होतं.
” विहार ” म्हणजे आपली हालचाल. प्रामुख्याने चालण्यादी पायांच्या क्रियांचा ह्यात अंतर्भाव होतो. मनातील विचारांच्या कमी जास्त होण्याचाही ह्या ‘ विहार ‘ या शब्दात समावेश होतो. अहितकर विहारात शरीराला त्रासदायक होऊ शकतील अश्या हालचालींचा समावेश होतो.
हाताच्या, मानेच्या, पापण्यांच्या, डोळ्यांच्या, कानाच्या, पोट-पाठीच्या इत्यादि अशास्त्रीय हालचालींना,ज्याने वेदना,अस्वस्थता निर्माण होऊ शकेल,त्यास “अहितकर शारीरिक विहार” म्हणू शकू.

खोडकर मन

मागील लेखात त्या ” खोडकर ” मनाबद्दल बोललो ना ? त्याला तर अहितकारक गोष्टींकडे जायचा,विहार करायचा मोह होतंच असतो.त्याला जरा जास्तच सांभाळावं लागतं. आरोग्यासाठी खूप काही सवयी लावून घ्याव्या लागतात आणि नियम करावे लागतात. मग मात्र निश्चितच आनंदीआनंद होणे शक्य असतं.

डॉ.सुधीर अनंत काटे, प्राधिकरण,निगडी,पुणे-४४.