औषधाविना आरोग्य – ५

आयुर्वेदामध्ये अनेक शाश्वत सिध्दांत आहेत. त्यातील हा एक सिद्धांत.

‘सारख्या, समान गुणधर्माच्या वस्तू  त्याच प्रकारच्या  गुणधर्मांच्या वस्तूंमध्ये टाकल्यास आधीच्या वस्तूंमध्ये वाढ होते.’
हा अतिशय महत्वाचा असा सिद्धांत ‘औषधाविना आरोग्य’ या गोष्टीसाठी लक्षात घेणे जरूरीचे आणि योग्य असे आहे.

काही उदाहरणे

शरीरामध्ये, निसर्गामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. त्याची काही उदाहरणे घेऊ. एका झाडाची पाने गोळा केली. त्यात दुसऱ्या झाडांची पाने आणून टाकली की पानांची संख्या जास्त होते. आंब्याच्या झाडाच्या पानांत आंब्याच्या झाडाची पाने टाकली की आंब्याच्या झाडांच्या पानांची संख्या वाढते, किंवा मोगऱ्याच्या फुलामध्ये मोगऱ्याची आणखी फुले टाकली की परडीमध्ये मोगऱ्याची फुले वाढतात, साहजिकच दरवळही द्विगुणित होतो.

देवगड हापूस आंब्याचा रस केला असल्यास त्यामध्ये आणखीन चार देवगड हापूस आंब्याचा रस टाकला तर रसाची मात्रा वाढते. रसाचे प्रमाण वाढते आणि सर्वांना आमरसाची जास्त मजा घेता येते. दूध टाकल्यानेही आमरसाचे प्रमाण वाढते पण आमरसाची प्रत कमी होते. त्याचप्रमाणे तुरीच्या डाळीमध्ये आणखीन पाव किलो तुरीची डाळ टाकली की तुरीच्या डाळीचे प्रमाण वाढते. इथेच, समानाने समानाची ‘वृद्धि’ म्हणजेच ‘वाढ ‘ झालेली दिसून येते. हा सिद्धांत वा नियम कुठेही आणि कधीही लागू पडणारा आहे.

हाच नियम आरोग्याला

हा नियम आरोग्यासाठीही लागू पडतो शरीरामध्ये असणारे रस, रक्त, मांस, अस्थी म्हणजे हाडे, रक्तातील सूक्ष्म असे घटक यांची शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य प्रमाणात आवश्यकता असते. शरीरातील प्रथिने (proteins), स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके (साखरयुक्त घटक), पाणी यांचेही प्रमाण योग्य असे असावे लागते. ठराविक घटक कमी झाले की याची आवश्यकता भासू लागते.
उदाहरणार्थ, शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की अनुत्साह, मरगळ, थकवा, दमल्यासारखे वाटते.  तेव्हा शरिराला पाण्याची गरज असते, अशा वेळी लगेच पाणी, लिंबू सरबत वा काही पेये देण्यात यावी. शरीर धष्टपुष्ट करायचे असेल तर मांसाहार अथवा मांसवर्धक घटकद्रव्य पदार्थ खाणे जरुरीचे असते. त्यामुळे मांसाची वाढ होऊन शरीर धष्टपुष्ट होते. त्याचप्रमाणे हाडांची वाढ होण्यासाठी अस्थिवर्धक पदार्थ खाणे आवश्यक असते. रक्ताची वाढ होण्यासाठी रक्त सर्वगुणसंपन्न होण्यासाठी रक्ताची वाढ होणारा आहार वा पदार्थ घ्यावेत. रक्तदानाचे महत्व आणि उपयोग तर आपल्याला माहिती आहेतच. रक्त शरीरामध्ये देऊन रक्त वाढविले जाते, ही समानाने समानाची  वृध्दी.

चांगल्या विचारांशी मैत्री केली की आपल्याही मनात चांगल्या विचारांची भर पडते. समानाने समानाची वाढ होईल.
म्हणजे शरीर आणि मन सुस्थितीत राहून आरोग्य टिकण्यात मदत होईल.