औषधाविना आरोग्य – ७

आता आपण ” योग ” या विषयातील एका भागाबद्दल समजून घेणार आहोत. योग म्हणजेच ‘अष्टांग योग ‘. हा शब्द ग्रंथांमध्ये असतो. ‘अष्टांग’ याचा अर्थ ‘अष्ट’ अंग.’अष्ट ‘ म्हणजे ‘आठ’.यामध्ये  आठ अंगे,आठ विभाग सामावलेले आहेत.त्यास ‘अष्टांग’ असे म्हटले जाते.योगाचे म्हणजेच अष्टांग योगाचे आठ  विभाग आहेत.ते खालील प्रमाणे….

अष्टांग योग

  1. यम
  2. नियम
  3. आसन (योगासन)
  4. प्राणायाम
  5. प्रत्याहार
  6. धारणा
  7. ध्यान
  8. समाधी.

“योगासन” हा तिसरा प्रकार सर्व जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. प्राणायाम,ध्यान हे प्रकारही काही जाणकार लोकांकडून केले जातात. पण योगासने हा प्रकार अतिशय उत्साहाने आणि सातत्याने केला जात आहे. योगासने प्रत्येकाने करावीत, निदान ‘सूर्यनमस्कार’ तरी रोज घालावेत. त्याचे खूप फायदे होतात. औषधाविना आरोग्यासाठी तर ते अत्यावश्यकच आहेत. शरीराच्या बाहेरील आणि आतील हालचाली, दोहोंनाही त्याचा खूप फायदा होतो.

सत्य

यावेळी आपण अष्टांग योगातील पहिल्या  ‘यम’ या विभागातील ‘सत्य ‘ या उपविभागाबद्दल समजून घेऊ. ‘यम ‘ मध्ये पाच विभाग,कामं आहेत.१)अहिंसा २)सत्य ३)अस्तेय ४)ब्रह्मचर्य ५)अपरिग्रह. योग साधना करताना यातील प्रत्येक प्रकार, प्रत्येक काम , प्रत्येक सवय लावून घेणे आवश्यक आहे, त्यामुळे  आरोग्य आणखी सुधारण्यास मदत होते.
यातील ” सत्य ” म्हणजे ” खरं बोलणे ” याबद्दल सुरुवात म्हणून थोडसं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ” सत्य ” हा अंगीकारण्यात अवघड असा प्रकार आहे. पण तरीही त्याची सवय लावून घेतली तर मिळणारा आनंद,समाधान खूप असते.त्याची सवय लावून घेण्यासाठी एक उपाय सांगतो. रोज मनाशी ठरवायचे की मी दिवसाच्या ठराविक वेळी, समजा सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत, “खरंच” बोलणार, खोटं काहीही बोलणार नाही, स्वतःशी आणि दुस-याशीही. (अवघड असतं हं. कारण, खोटं बोलण्यात आपण, बहुदा सर्वजण, तरबेज असतो). किमान एकदा तरी हा प्रयत्न करुन बघा. त्याचा मिळणारा आनंद आणि वाढणारा आत्मविश्वास तुम्हाला ताकद देईल. एकदा जरी असे घडले तर माझा तुम्हाला प्रणाम आहे.(योगासने,सूर्यनमस्कार चालूच ठेवायचेत हं.)

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.